ठाण्यातील शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी आज पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. एकनाथ शिंदे ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.
पूर्णेकर कुटुंबाशी आपले अनेक वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध असल्याचे सांगताना प्रताप सरनाईक म्हणाले की, बाळकृष्ण पूर्णेकर, जयनाथ पूर्णेकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांशी जुने संबंध आहेत. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना अनेक सहकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबावर आलेल्या या दुःखद प्रसंगाची आपल्याला जाणीव असून, या कठीण काळात त्यांना आधार देणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.