filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (0.4911111, 0.4911111); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 6500; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 31.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
ठाणे, दि. 18 : ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पाच वर्षांत नियमबाह्य पद्धतीने वाटप केलेल्या वाणिज्य, निवासी आणि भूखंडांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करावी. तसेच गैरप्रकार आढळलेल्या मालमत्ता पुन्हा ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेच्या शुक्रवारच्या महासभेत शहरातील रस्ता रुंदीकरण आणि विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या वाणिज्य गाळेधारकांना निवासी गाळे देण्याचा विषय मांडण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून वाणिज्य जागा गमावलेल्या शेकडो नागरिकांकडून महापालिकेकडून जागा मिळविण्याच्या प्रतिक्षेत आहेत. हक्काची जागा गमाविलेल्या या नागरिकांची फरपट होत असून, या नागरिकांवर अन्याय होत आहे, अशी भूमिका गटनेते मुकेश मोकाशी यांनी मांडली. तसेच त्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्याची विनंती केली. तसेच गेल्या पाच वर्षांतील स्थावर मालमत्ता विभागाकडून झालेल्या मालमत्ता वाटपाच्या चौकशीची मागणी केली.

महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून स्थावर मालमत्ता विभागाकडे वाणिज्य, निवासी मालमत्ता आणि भूखंड हस्तांतरित केले जातात. त्याचा तपशील महासभेपुढे ठेवावा. गेल्या पाच वर्षात वाटप केलेल्या मालमत्तांच्या व्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करावा. तसेच या अहवालानंतर अनियमितता व अपात्र व्यक्तींना दिलेल्या मालमत्ता महापालिकेने पुन्हा ताब्यात घ्याव्यात. तसेच दोषी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी केली आहे.