ठाणे, दि. 18 : कोपरी परिसरातील रस्त्यालगत दररोज कचरा पडणारे १८ कचरा स्पॉट बंद करण्यासाठी भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर कचरा साचणारे स्पॉट बंद करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘स्वच्छ कोपरी व सुंदर कोपरी’च्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांचे आभार मानले आहेत.
ठाणे पूर्व भागातील कोपरी गाव, कोपरी कॉलनी, बारा बंगला, रेल्वे स्टेशन परिसरात दररोज सुमारे एक ते सव्वा लाख लोकांची वर्दळ सुरू आहेत. त्याचबरोबर कोपरीमधून परिवहन बसची सेवा असल्यामुळे सातत्याने गर्दीत वाढ होत आहे. बारा बंगला परिसरात महत्त्वाचे अधिकाऱ्यांचे वास्तव्य आहेत. त्याचबरोबर महत्वाची कार्यालये आहेत. या पार्श्वभूमीवर कोपरीत रस्त्यालगत १८ ठिकाणी दररोज कचरा साचत होता. या ठिकाणी नागरिकांकडून दिवसभर कचरा टाकला जात असल्यामुळे दुर्गंधी पसरत होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी ‘स्वच्छ कोपरी, सुंदर कोपरी आणि बदलती कोपरी’ असा संकल्प करीत कोपरी परिसर हा कचरा स्पॉट मुक्त करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी १८ कचरा स्पॉट बंद करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
ठाणे पूर्व परिसरातील पाच कंटेनर, बिल्डिंग नं. ९/११, रसिका डेकोरेटर्स-कोळीवाडा, कोपरी गाव, निर्मलादेवी वसाहत, विजय नगर, शांती नगर, श्राद्ध विधी, शिवम हॉटेल, रेल्वे गेट, संत तुकाराम मैदान,बीएमसी टाकी, चेकनाका, पारशीवाडी रेशनिंग ऑफिस, पवार कचरा टाकी, गंगोत्री कचरा टाकी, बोबाटे कचरा टाकी, औंदुबर छाया या ठिकाणांवरील कचरा स्पॉट टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत, अशी माहिती नगरसेवक भरत चव्हाण यांना महापालिकेकडून पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.